पुणे जिल्हा : लोणी एमआयडीसीत कामगारांचे उपोषण

बहुराष्ट्रीय कंपनीने कामगारांना तडकाफडकी कामावरून काढले
लोणी देवकर – येथील आखाती देशातील बहुराष्ट्रीय कंपनी टॉवेल इंजिनिअरिंग यांनी येथील स्थानिक 12 कामगारांना कोणतेही पूर्वकल्पना न देता अचानक कामावरून काढून टाकल्याने ते कामगार मागील दोन दिवसांपासून संबंधित कंपनीच्या गेट समोर आमरण उपोषण करीत आहेत.

ऐन सणासुदीच्या तोंडावर या कामगारांना तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे गेटवरील सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. याबाबत त्या कामगारांनी संबंधित कंपनी प्रशासनाला विचारणा केली असता आमचा तुमचा संबंध नसून तुम्ही लेबर कॉन्टॅक्‍टमध्ये आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून आमरण उपोषण करीत असलेल्या कामगारां बाबत अद्याप कसली कसलीही संबंधित कंपनी प्रशासनाने घेतली नाही.

स्थानिकांना रोजगार मिळावा तसेच त्या भागातील दळणवळण आणि रोजगार निर्मिती आदी हेतूने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. इंदापूर तालुक्‍यातील लोणी देवकर येथे देखील हजारो विकारांवरती पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली.

मात्र या औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अनेक लहान मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल अशी आशा होती; परंतु तसे काही होताना दिसत नाही. लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान-मोठ्या खासगी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. यामध्ये स्थानिक कामगारांना जाणीवपूर्वक डावलून परराज्यातील कामगार भरती केले जातात.

कंपनीकडून प्रतिक्रिया नाही
कामगारांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत त्यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी कंपनीचे मानवसंसाधन अधिकारी दीपक चव्हाण आणि व्यवस्थापक सोळंके यांना विचारणा केली असता त्यांनी फोन देखील उचलण्याची तसदी घेतली नाही तसेच त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षारक्षकांना अगोदरच बजावून ठेवले असल्याने त्यांनी देखील संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितले.

माहिती मिळाली की कळवितो
सहाय्यक कामगार आयुक्‍त यांच्या कार्यालयाला प्रतिक्रिया घेण्याबाबत विचारले असता त्यांनी नुकतेच आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली असून आम्ही माहिती घेऊन आपणास कळवितो असे सांगितले.