पुणे : दिवाळी पहाटचे कार्यक्रमही ‘अनलॉक’

पुणे –दिवाळीच्या कालावधीत स्वादिष्ट फराळाबरोबरच पुणेकर रसिक दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतात. दिवाळी पाडवा आणि शहरांतील विविध भागात होणारे कार्यक्रम हे रसिकांसाठी समीकरण असते. मात्र, करोनामुळे यामध्ये खंड पडला होता. त्यामुळे यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम होणार का, याबाबत साशंकता होती. पण, पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

दरवर्षी शहर आणि उपनगरांत सुमारे 250 हून अधिक कार्यक्रम होतात. दिवाळीपूर्वीच महिनाभर आधीच दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे आयोजन, बुकिंग आणि तिकीटवाटप सुरू होते. याद्वारे दरवर्षी सुमारे 2 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते. मात्र, करोनामुळे मागील वर्षी हे आयोजन रद्द करावे लागले. यंदादेखील याबाबत साशंकता होती. परंतु, शुक्रवारी पवार यांनी त्यावर पडदा टाकला.

आयोजक म्हणतात…
करोनामुळे बहुतांश व्यवहार 50 टक्के क्षमतेने सुरू आहेत. नाट्य आणि चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनेच खुली आहेत. येत्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही 50 टक्‍के क्षमतेनुसार नियोजन करणे आवश्‍यक आहे. मात्र, दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व, नाट्यगृहांचे दर, कलाकारांचे मानधन आदी बाबी लक्षात घेत व्यावसायिकदृष्ट्या 50 टक्के क्षमतेनुसार नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे आयोजक सांगतात.

महापालिकेने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठीच्या बुकिंग तारखा उशिरा जाहीर केल्या. त्यामुळे ऐनवेळी कलाकार आणि प्रायोजकांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करणे काहीसे आव्हानात्मक आहे. दरवर्षी साधारण महिनाभर आधीच कार्यक्रमांच्या आयोजनाला सुरूवात होते. याशिवाय शासनाच्या नियमानुसार आयोजन करावे लागणार आहे. नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.
– सुनील महाजन, आयोजक

उमेदवारांकडून कार्यक्रमांचे आयोजन
यंदा दिवाळी आणि आगामी निवडणुका लक्षात घेत आता इच्छुक आणि त्यांच्या नेत्यांनीदेखील दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. आपल्या प्रभागांतील चौक, शाळांची मैदाने, उद्याने, सोसायट्यांचे आवार आदी ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला आहे.