पुणे: बूस्टरसाठी ज्येष्ठांना सहव्याधी असल्याचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र आवश्‍यक

दि.10 जानेवारीपासून कागदपत्रे पाहूनच देणार लस

पुणे – हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सशिवाय साठ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बूस्टर’डोस दिला जाणार आहे. मात्र, “कोमॉर्बिड’ अर्थात अन्य गंभीर आजार असलेल्याच ज्येष्ठ नागरिकांना “बूस्टर’चा डोस मिळणार असून, तसे प्रमाणपत्र त्यांनी डॉक्‍टरांकडून आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हा डोस देण्याची प्रक्रिया अगोदरप्रमाणेच असणार आहे. आधार क्रमांकाच्या आधारेच ही नोंदणी होणार आहे. साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पात्र व्यक्तीने दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवड्यांचा कालावधी उलटला, असेल तरच ते तिसऱ्या “बूस्टर’ डोस साठी पात्र असणार आहेत, अशी माहिती “राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे दिली आहे.

“बूस्टर’ को-विन ऍपवर नोंदणी करताना “कोमॉर्बिडीटी’विषयीचा कॉलम भरावा लागणार आहे. त्यानंतर लस घेण्यासाठी केंद्रावर गेल्यानंतर तेथील नियुक्त अधिकाऱ्यांना ते व्याधीचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच “बूस्टर’ डोस दिला जाणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.