PUNE: कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण

पुणे – खडकवासला धरणातून शहर तसेच ग्रामीण भागासाठी पाणीपुरवठा केल्या जाणारा नवीन मुठा उजवा कालवा बंदिस्त करून बोगद्याद्वारे पाणी खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत नेले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले असून यात अनेक ठिकाणी कालव्याच्या बाजूला पाटबंधारे विभागाची मोठ्या प्रमाणात जागा आहे.

तसेच कालवा बंदिस्त केल्यानंतरही जागा वाढत असल्याने या प्रकल्पासाठी या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

या प्रकल्पासाठी सुमारे २२०० कोटींचा खर्च अपेक्षित असून वेगवेगळ्या माध्यमातून हा खर्च उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त कुमार म्हणाले की, हा बोगदा केल्याने सुमारे तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. हा कालवा शहराच्या मध्य भागातून जात असल्याने महापालिका आणि पाटबंधारे विभाग हा प्रकल्प संयुक्त स्वरूपात राबविणार असल्याने महापालिकेने या कालव्याचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेस दिले होते.

त्यानुसार, पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात जागा असून त्याचा व्यावसायिक वापर केल्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी या जागा महत्त्वाच्या ठरणार असल्याने याबाबत पुढील बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.