Pune: गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरण: डीएसके पुत्र शिरीष यांचा जामीन फेटाळला

पुणे – आकर्षक परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांचे पूत्र शिरीष यांचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला.

या प्रकरणात 30 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूकीसह भारतीय दंड संहिताच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे. हेमंती मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

तर डीएसके यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यांनतर शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांच्यामार्फत जुलै महिन्यात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोध करत जामीन फेटाळण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने जामीन फेटाळला.