PUNE: ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थार्जनाच्या संधी

पुणे – सरकार मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाच्या संशोधनावर खर्च करीत आहे. सर्व क्षेत्रातील विस्तार पाहता मानवरहित विमान आणि ड्रोन तंत्रज्ञानाला तरुण आणि कल्पक बुद्धिमान व्यक्तींची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यात संशोधनाच्या, अर्थार्जनाच्या अनेक संधी आहेत, असे सी-डॅकचे वरिष्ठ संचालक जी. संजीवन यांनी सांगितले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलते होते. भारती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, सी-डॅकचे सहसंचालक डॉ. शिवकुमार, सहसंचालक कौशल शर्मा, तंत्र अधिकारी हर्षदा देशपांडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहनी, उपक्रम प्रमुख डॉ. दीपक बनकर, फॅकल्टी कॉर्डिनेटर स्नेहल चौधरी, सुदर्शना अब्बड आदी उपस्थित होते.

सेवा क्षेत्रात ड्रोन उपयुक्त असून, रोजगार आणि अर्थार्जनाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यात सरकारची धोरणे पूरक आहेत. दरवर्षी ड्रोन निर्मिती क्षेत्र १० टक्क्यांनी वाढत आहे. १० लाख व्यक्तींना त्यात रोजगार प्राप्त होणार आहे, असे डॉ. शिवकुमार यांनी सांगितले.

गुणवान विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांमध्ये संधी दिली जाईल, असे कौशल शर्मा यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिबिरातून अभ्यासक्रमाच्या पलीकडचे ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करावीत. प्रचलित प्रवाहांना समजून घ्यावे आणि संशोधनावर भर द्यावा. असे डॉ. विदुला सोहोनी यांनी सांगितले.