Pune : लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह 8 पोलिस तडकाफडकी निलंबित

पुणे – पुणे स्टेशन येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंह गाैड यांच्यासह आठ जणांना अपर पोलिस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलित केले आहे.

अमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी दोन दिवसापुर्वी दिले आहे. एकाचवेळी वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खात्यात चर्चेला उधाण आले आहे.

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वे मार्गे महाराष्ट्र व इतर राज्यात विक्रीसाठी आलेला दोघांना लोहमार्ग पोलिसांनी मागील वर्षी (२०२०) अटक केली होती. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता.

या चरसची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत १२० कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जिल्हा कूलु) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलु) या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे होता. त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यानंतर एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढे देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह आठ जणांना निलंबीत करण्यात आले आहे.