Pune: ईव्हीएम यंत्र निघाली मतदान केंद्राकडे…

पुणे – लोकसभा निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे आज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण सुरू झाले आहे. मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी. वितरणाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये करता येईल का, याची चाचपणी करावी, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे, ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी आदी उपस्थित होते.

– अन्नधान्य महामंडळ गोदाम परिसरात केंद्र
– ईव्हीएम, व्हीव्हीपॅट वितरणासाठी प्रत्येकी ५ कक्ष
– या कक्षात १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
– कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय वेगळ्या रंगाचे टी-शर्ट
– जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पूर्ण
– सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्कॅनिंग
– बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट लोखंडी पेट्यामध्ये बंद
– एका पेटीत १० युनिट ठेवल्यानंतर गोदामात ठेवण्याची कार्यवाही

जीपीएस असलेले वाहन अन्‌ पोलीस बंदोबस्तात…
जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून ते संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे. एका यंत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचारी पुढील यंत्रासाठी पुढील वितरण कक्षाकडे जाईल. वितरीत केलेले यंत्र जीपीएसअसलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुम नेण्यात येतील, अशी माहिती निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.