PUNE : संसर्गाने डोळे लाल…; जिल्ह्यात आढळले 16,105 रुग्ण

पुणे – राज्यात “डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ नोंदवली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 851 या आजाराचे बाधित आढळले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 16, 105 रुग्ण सापडले असून, पिंपरी-चिंचवडमध्ये 4,445 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऍडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो. हा सौम्य संसर्ग असला, तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात आलेल्या दुसऱ्याला याची लागण होऊ शकते. त्यामुळे संसर्ग वाढतो. राज्यातील बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत डोळे येण्याची साथ अधिक आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • ज्या भागात डोळे येण्याची साथ आहे, त्याठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे
  • शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहे
  • सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी लागणारी आवश्‍यक औषधे देण्यात येत आहेत
  • राष्ट्रीय विषाणू संस्था आणि राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचा अभ्यास केला.

डोळ्यांना संसर्ग झाल्यास काय करावे?

  • डोळ्यांना संसर्ग झाल्यास काय करावे?
  • सर्वप्रथम नेत्ररोग तज्ज्ञांकडून (डोळ्यांचे डॉक्‍टर) योग्य उपचार घ्यावेत.
  • स्वत:च्या मनाने कोणतेही घरगुती उपचार करू नयेत.
  • परस्पर मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊ नये. किंवा घरातील जुने औषध वापरू नये.
  • सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. वेळोवेळी हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवावे.

याकडे प्राधान्याने लक्ष द्या…

डोळा लाल होणे, वारंवार पाणी येणे, डोळ्याला सुज येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. हा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवावेत. डोळ्यांना हात लावू नये. स्वत:ची शारीरिक स्वच्छता पाळावी. घर व परिसरात स्वच्छता ठेवून माशा, चिलटे यांचे प्रमाण कमी करावे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जागृतीपर सूचना फलक…
शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांत डोळे येण्याची साथ वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने खबरदारी घेत मुलांमध्ये जागृती सुरू केली आहे. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, संसर्ग होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, डोळे आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देऊन जागृती करण्यात येत आहे.

शाळांमध्ये डोळे तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना लक्षणे दिसून येतात त्यांनी जवळच्या मनपा रुग्णालयात डॉक्‍टरांकडून डोळे तपासणी करून औषधोपचार घ्यावे. विशेषत: या रूग्णांनी स्वत:ला विलगीकरण करून घ्यावे. – सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे मनपा

जिल्हानिहाय डोळ्यांचे बाधित

बुलढाणा – 35,466, जळगाव – 19,632, पुणे – 16,105, नांदेड – 14,096, अमरावती – 12,290, अकोला – 12,134, धुळे – 9,631, चंद्रपूर-9,399, परभणी – 9,077, वाशिम- 9,031, नंदुरबार – 7,681 या प्रमाणे रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.