PUNE: शेतकरी आक्रोश मोर्चाची आज सांगता

पुणे – शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकर्‍यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. हा शेतकर्‍यांच्या आक्रोश दिल्ली दरबारी पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू केला आहे. या मोर्चाची सांगता आज पुण्यात होणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी तीन वाजता हा मोर्चा येणार असून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभेने मोर्चाची सांगता होणार आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा मोर्चा काढला आहे.