पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 40 (जुना क्र. 28/36); सॅलीसबरी पार्क-महर्षीनगर/मार्केट यार्ड-इंदिरानगर

पुणे (व्यंकटेश भोळा/हर्षद कटारिया)  यापूर्वीच्या जुना प्रभागातील 45 टक्‍के भाग अन्य प्रभागात विस्तारला गेला आहे. जुना प्रभाग क्रमांक 28 आणि 36 चा भाग मिळून नव्याने प्रभाग क्र. 40 तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत येथे चारही उमेदवार भाजप पक्षाचे निवडून आले होते. यावेळेस आमदार माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण मिसाळ या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. कविता वैरागे, श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे व राजेंद्र शिळीमकर असे अनुभवी उमेदवार येथे नगरसेवक आहेत.
यातील बहुतांश जणांनी पालिकेत महत्त्वाची पदे भूषविली आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादी पक्षाने जोरदार लढत दिली होती. यावेळेस महाविकास आघाडी एकत्रपणे लढल्यास या प्रभागात नव्या चेहऱ्यांचे आव्हान अनुभवी नगरसेवकांपुढे असणार आहे.

विद्यमान नगरसेवक

गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम

प्रभागातील डायस प्लॉट वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने अनेक वर्षे प्रयत्न केले. त्यांना जमले नाही, पण माझ्या बजेटमधून डायस प्लॉट ते गिरिजा भवनपर्यंत भव्य उड्डाणपूल उभारले. त्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी दूर झाली.श्रीनाथ भिमाले (भाजप)

महिलांसाठी अद्ययावत व्यायामशाळा, क्रीडा संकुल, बिबवे प्रशालेत बहुउद्देशीय खेळाचे मैदान असे क्रीडाक्षेत्रात भरीव पूर्ण केले आहे. डायस्कोन्स्टिक सेंटर उभारले असून, त्यात दंत आणि नेत्र तपासणी मोफत, अल्पभूधारकांना मोफत औषधाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.राजेंद्र शिळीमकर (भाजप)

अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे सुशोभिकरण आणि नूतनीकरण केले. तसेच, स्वामी विवेकांनद रस्ता स्मार्ट बनविला. प्रभागात ठिकठिकाणी वाचनालय आणि अभ्यासिकाची निर्मिती केली आहे. प्रभागात जलतरण तलावाचे 70 टक्‍के काम झाले असून, ते पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मानसी देशपांडे (भाजप)

परिसरात गेल्या वीस वर्षांत भव्य उद्याने उभारली तसेच तेथे सुशोभिकरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र उभारले. वाचनालय उभारले, ई-लर्निंग शाळा, सांस्कृतिक हॉल, अभ्यासिका प्रयत्नातून उभारले. वसाहतमध्ये दवाखाना उभारण्यात आला.कविता वैरागे (भाजप)

गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…

प्रभागात अनेक समस्या आहेत. व्यसनमुक्‍त प्रभाग, फुटपाथवरील भाजी विक्रेत्यासाठी मंडई, सुरक्षित वाहनतळ, रुग्णालय असावे. तसेच ठेकेदार हे नातेवाईक किंवा नगरसेवक नसावेत. महापालिकेत निवडून आल्यानंतर जी शपथ घेतली जाते त्याप्रमाणे वागणारा प्रतिनिधी असावा.एकनाथ ढोले (शिवसेना)

मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता असूनही सत्ताधारी नगरसेवकांनी कोणतेही धोरणात्मक, विधायक काम केलेले नाहीत. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्या’ची दुरवस्था आहे. प्रभागात ना महिलासाठी स्वच्छतागृह, झोपडपट्टी पुनर्वसन सारखे प्रकल्प नाहीत.शर्वरी गोतरणे (कॉंग्रेस)

आंबेडकर नगर, प्रेमनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी गंगाधाम रोडचा विकास कुठेही झालेला दिसत नाही. तेच फुटपाथ काढणे आणि पुन्हा नव्याने लावणे एवढ्याच प्रकारचे काम मुख्य रस्त्यावर दिसते. वस्ती पातळीवर आजदेखील प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.संतोष नांगरे (राष्ट्रवादी)

या प्रभागात मैदानाची कमतरता, वाहतुकीचे फसलेले नियोजन, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, मोठ्या प्रकल्पात वाहतुकी संदर्भात विचार व्हावा, कचऱ्याच्या समस्येवर कोणताही तोडगा किंवा प्रयत्न सुद्धा झालेला नाही. नगरसेवकांच्या मानसिकतेमुळे हा प्रभाग विकासापासून दूर राहिला आहे.ऍड. वैशाली शिंगवी (राष्ट्रवादी)

2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, कविता वैरागे, आदित्य झागडे, चेतन चावीर, अरविंद गायकवाड, अशोक खंडागळे. राष्ट्रवादी : वैशाली शिंगवी, सुनील बिबवे, योगेश पवार, विनय पाटील, जयश्री त्रिभुवन, बाप्पू तळेकर. कॉंग्रेस : शर्वरी गोतरणे, सादिक लुकडे, सुरेश चौधरी, अविनाश गोतरणे. शिवेसना : एकनाथ ढोले, अरुण पापळ, अमोल रासकर, पूजा रासकर. मनसे : अस्मिता शिंदे.