पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 56 (जुना क्र. 39) चैतन्य नगर – भारती विद्यापीठ

पुणे (धीरेंद्र गायकवाड) – आतापर्यंतच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक/नगरसेविका या प्रभागामध्ये कार्यरत आहेत. भाजपचे खडकवासला विधानसभा मतदासंघातील हॅट्ट्रिक साधणारे विद्यमान आमदार हे देखील येथून दोन टर्म नगरसेवक राहिले होते. तर, भाजपच्या विद्यमान नगरसेविका गेल्या तीन पंचवार्षिकपासून निवडून येत आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर पॅनलमधील अन्य उमेदवार निवडून येण्यास आतापर्यंत यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे यावर्षी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पारडे जड असले तरी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामध्ये प्रभाग क्र. 39-40 या प्रभागातील भाग मिळून आता हा नव्याने प्रभाग क्र. 56 झाल्याने नव्या प्रभागातील भाग समाविष्ट झाल्यानंतर तेथील ही उभय पक्षातील उमेदवारामार्फत या प्रभागात तयारी सुरू केली आहे.

प्रभागातील समाविष्ट भाग

धनकवडी बसस्थानक, मोहननगर, गुलाबनगर, राऊत बाग, चैतन्य नगर, आंबेगाव शिव, भारती विद्यापीठ, श्रेयस गार्डन, मोरेबाग, वंडर सिटी, सावंत विहार, त्रिमूर्ती चौक, शनी मंदिर परिसर, सरहद चौक, इत्यादी मिळून प्रभाग तयार झाला आहे.

विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
बहुउद्देशीय भवन, आरोग्य सेवेसाठी स्व. विलासराव तांबे दवाखाना, ज्येष्ठ नागरिकांसाठी नऊ विरंगुळा केंद्र, प्रभागात ई-वेस्ट प्रोजेक्‍ट, तीन ठिकाणी कचरा संकलनासाठी आरोग्य कोठी, आंबेगाव पठार भागात पाणीप्रश्‍न सोडविला, राऊटबाग येथे कलव्हर्ट बसविला.विशाल तांबे (राष्ट्रवादी)

सर्व्हे नंबर 35 येथे क्रीडांगण व जॉगिंग ट्रॅक केला. इनडोअर गेम्ससाठी दीड एकर जागेत स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स केले. राजमाता जिजाऊ बहुउद्दशीय हॉल तयार केला. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, प्रभागातील जुन्या मलवाहिन्या बदलून मोठ्या व्यासाच्या टाकल्या.वर्षा तापकीर (भाजप)

पिण्याच्या पाण्याची सोय केली. धनकवडी येथील स्मशानभूमी अद्ययावत केली. कुस्तीपटूंसाठी नामदार शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय सभागृह येथे कुस्ती संकुल उपलब्ध केले. राजमुद्रा सोसायटी व राऊत बाग येथे बॉक्‍स कलव्हर्टसाठी प्रयत्न केले. सर्व्हे नं. 35 येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र केले.बाळाभाऊ धनकवडे (राष्ट्रवादी)

प्रभागातील पुणे मनपाच्या “कै. उत्तमराव धनकवडे शाळे’चे नूतनीकरण केले. धनकवडी स्मशानभूमीचे नूतनीकरण केले. प्रभागात लहान मुलांना मैदाने उपलब्ध नसल्याने ठिकठिकाणी जागेवर लहान मुलांची खेळणी बसवली. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन विरंगुळा केंद्र बनवली.अश्‍विनी भागवत (राष्ट्रवादी)

गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…

या प्रभागातून गतपंचवार्षिकच्या निवडणुकीत विरोधकांपुढे मोठे आव्हान निर्माण करणारे आणि भारतीय जनता पक्षाकडून तुल्यबळ लढत देणारे उमेदवार दिवंगत गणेश भिंताडे यांच्या आकस्मिक निधनाने या ठिकाणी मोठी राजकीय, सामाजिक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये आहे.

प्रामुख्याने प्रभागामध्ये मुख्य विकासकामामध्ये अद्ययावत हॉस्पिटल, ई-लर्निग स्कूल, लहान मुलांसाठी प्ले-ग्राउंड, सांस्कृतिक हॉल व भाजी मंडई यांची कमतरता आहे. आरक्षित जागा अजूनही काही ताब्यात नसल्याने विकासकामे अडकली आहे. श्रद्धा परांडे (राष्ट्रवादी)

प्रभागांमध्ये जनतेचा निधी त्याच त्याच कामांवर खर्चू करून निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर प्रभागांमध्ये महत्त्वाच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत, याकडे दुर्लक्ष करून फक्‍त प्रभागातील झालेल्या कामांवरच पुन्हा खर्च केला जातो आहे.अभिषेक तापकीर (भाजप)

प्रभागातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटला नाही. कचरा घेऊन नेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. पाण्याचा प्रश्‍न पूर्ण सुटलेला नाही. विजेची समस्या कायम आहे. सिमेंट कॉंक्रिट रस्ते कमी प्रतीचे तयार करण्यात आले. भाजी विक्रेते जागेची समस्या व वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहे.मोहिनी देवकर (भाजप)

2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : विद्यमान नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, अभिषेक तापकीर, अरुण राजवाडे, सचिन बदक. राष्ट्रवादी कॉंग्रेस : विद्यमान नगरसेवक विशाल तांबे, युवराज बेलदरे, विद्यमान नगरसेविका अश्‍विनी भागवत, माजी नगरसेवक संतोष फरांदे, स्वीकृत सदस्य युवराज रेणुसे, शंकर कडू. शिवसेना : अनिल भोसले, नेहा कुलकर्णी, निकिता पवार. आम आदमी पार्टी : कृष्णा गायकवाड. कॉंग्रेस : नरसिंग आंदोली, दिलीप दोरगे, अर्चना शहा (भिवरे पाटील). पक्ष निश्‍चित नसणारे : ऍड. दिलीप जगताप.