पुणे – खतांचा साठा मागणीपेक्षा कमी

पुणे – पावसाळा लांबणीवर असला तरी राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. या हंगामासाठी 16.24 लाख क्विंटल बियाणांची मागणी आहे. तर 17.3 लाख क्विंटल बियाणांचा साठा आहे. मात्र, खतांचा साठा मागणीपेक्षा कमी आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बियाणे हे मागणीपेक्षा जास्त आहेत. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध करण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन खताची मागणी आहे. मात्र, अद्याप 31.10 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. कापूस पिकाखाली सुमारे 42 लाख हेक्‍टर क्षेत्र असून त्यासाठी 165 लाख बीटी पाकिटांची गरज आहे. या हंगामासाठी 226 लाख पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.

बोगस बियाणी विक्रीप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल
केंद्र सरकारची मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापूस बियाणांची विक्री होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये याप्रकरणी दहा गुन्हे दाखल झाले असून सुमारे 65 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 4516 पाकिटे आणि 1087 किलो बियाणे आहेत. रासायनिक खतांच अनधिकृत साठा केल्याचे 5 प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामध्ये 4105 मेट्रिक टन साठा जप्त झाला आहे.

Leave a Comment