PUNE: कचरा जाळणाऱ्यांवर अखेर कारवाई

पुणे – शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर आल्यानंतरही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. विशेष म्हणजे, या प्रकारात पालिकेचेच कर्मचारी सहभागी असल्याने कारवाई केली जात नव्हती. अखेर यात आयुक्तांनीच लक्ष घातले आहे.

या प्रकरणी घनकचरा विभागाकडून तातडीने कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कामाला लागलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मंगळवारी दिवसभरात ३३ ठिकाणी कारवाई केली. यातून तब्बल १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच स्वतंत्र पथके नेमून ही कारवाई अधिक तीव्र करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने महापालिकेस नियमावली दिली होती.

त्यानुसारआयुक्तांनी सर्व संबंधित विभागाना हवा प्रदूषण रोखण्यासाठीचे आदेश दिले होते. त्यात, कचरा जाळणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर मागील २० दिवसात ४१ जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात कचरा जाळण्याच्या येण्यार्‍या तक्रारी पाहता, ही कारवाई सरासरी दिवसाला दोन ठिकाणी होत असल्याने कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, त्यानंतर मंगळवारी कारवाई तीव्र करण्यात आली.