PUNE: लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत फॉर्म्युला तयार; नाना पटोलेंची माहिती

पुणे – राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. ज़ागा वाटपाचा फॉर्म्युला तयार असुन त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच अधिक जागा जिंकेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी वाटप केले जाणार आहे. पक्षातर्फे त्यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून त्या आधारे उमेदवारांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाईल. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसच जिंकेल,’ असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार असून, त्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, उलट महायुतीतच वाद आहेत. महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने राज्यातील लोकसभेच्या ४० ते ४१ जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीने ‘मेरिट’च्या आधारे जागावाटपाचे सूत्र निश्चित केले असून, लवकरच ते जाहीर केले जाईल. जागावाटपावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसून, महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येतील.

भाजपच्या विरोधात लढणाऱ्यांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असून, या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दिल्लीत चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘मी पक्षाचा शिपाई असून, पक्षाने मला आदेश दिला, तर लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे पटोले यांनी नमुद केले आहे. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक काँग्रेस जिंकणार, असा निर्धार पुण्यातील काँग्रेस भवनातच व्यक्त केला होता. त्याप्रमाणे पुणे लोकसभेची निवडणूकही काँग्रेसच जिंकणार असून, त्यासाठी उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. ‘इलेक्टिव्ह मेरिट’ हाच उमेदवारीचा निकष राहील, असेही पटोले यांनी सांगितले.