Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांचा केंद्रापर्यंत मोफत प्रवास ! केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे यांचा उपक्रम

वाघोली : गेल्या दोन वर्षांपासून केसनंद ग्रामपंचायत सरपंच प्रमोद हरगुडे यांच्याकडून १० वीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ये जा करणे सोपे व्हावे यासाठी मोफत रिक्षा व बसची सोय करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्यावतीने केसनंद मधील १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षाची सोय करण्यात आली आहे. पेपर पूर्वी सोडणे व पेपर नंतर परत आणले जाणार आहे. आज परीक्षेपूर्वी मुलांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देत रवाना करण्यात आले.

केसनंद मधील मुलांचे परीक्षा केंद्र वाडेबोल्हाई, वाघोली येथे आहे. सर्वच मुलांना परीक्षा केंद्राला जाण्यासाठी त्यांच्या पालकांकडे वाहन नसल्याने प्रमोद हरगुडे मित्र परिवाराने बस व रिक्षाची मोफत सोय करण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी सकाळी १५० मुलांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उत्साहात परीक्षा द्यावी यासाठी गेल्या दोन वर्षापासून मोफत बस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवला जात जात असून या कामी पालकांचे देखील सहकार्य होत असल्याचे प्रमोद हरगुडे यांनी सांगितले.