PUNE: आरोप खोटे असल्याचा धंगेकरांचा दावा

पुणे – भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकिशोर जगताप यांना शिविगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

यावर पत्रकार परिषद घेऊन आमदार धंगेकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी ते बोलत होते. तसेच ललित पाटील प्रकरणामुळे भाजप हा प्रकार असून पोलीस हे भाजपच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला आहे.

धंगेकर म्हणाले, या टाकीचे काम काॅग्रेस नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या काळात झाले आहे. तसेच मुख्यसभेत या टाकीच्या उद्‌घाटनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्याचा ठराव झाला होता. त्यानंतरही प्रशासनाकडून हा ठराव डावलून बेकायदेशीरपणे या टाकीचे उद्घाटन ठेवत, काॅंग्रेसला बाजूला ठेवले. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणूण आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी रागातून हा प्रकार घडला असून, माझे बोलणे ही कार्यकर्त्यांची भावना होती.

भाजपच्या दबावामुळे पोलिसांकडून माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जात आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध लावलेले ३५३ कलम चुकीचे असल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच महापालिकेच्या हिरवळीवर आंदोलने तसेच निषेध सभा घेण्यास मनाई असताना आपल्या विरोधात महापालिकेच्या अभियंता संघाने निषेध सभा घेतली. या प्रकरणी संबधितांवर कारवाई करावी, असे पत्र महापालिका आयुक्तांंना दिल्याचे धंगेकर यांनी यावेळी सांगितले.