पुणे: शनिवारवाड्यात कचरा पेटवला

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; पर्यटकांचे आरोग्यही धोक्‍यात
पुणे –
पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या शनिवारवाडा परिसरात झाडांचा कचरा जाळला जात आहे. आतील बाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या प्रकारांबाबत पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्व विभागाने तातडीनं या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

शनिवारवाड्याची देखभाल आणि नियोजन पुरातत्व विभागाकडे आहे. तर, बाहेरील परिसराची स्वच्छता महापालिकेकडून केली जाते. आतील सर्व व्यवस्थापन पुरातत्व विभाग पाहतो. या पर्यटनस्थळास दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असले, तरी आतील भागात अनेकदा अस्वच्छता दिसते. तसेच कचराही जाळला जात असून पर्यंटकांना धुराचा सामना करावा लागतो.

येथील माहितीफलक पुसट झालेले आहेत. इमारत परिसरात शनिवारी आणि रविवारी अस्ताव्यस्त पार्किंग असते. त्यामुळे पर्यंटकांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. दरम्यान, शनिवारवाड्यातच कचरा जाळला जात असल्याचे निदर्शनास आल्यावर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

लाइट अँड साऊंड शो बंद

शनिवारवाड्यात महापालिकेच्या माध्यमातून लाइट ऍड साऊंड शो चालवला जातो. हा उपक्रमही गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. 2019 च्या अखेरीस हा शो सुरू करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने केला होता. त्यानंतर करोनामुळे हा शो बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या शोसाठी महापालिकेस दुरूस्ती खर्च करावा लागणार आहे.

तिकिटाचे पैसे घेता, मग सुविधाही द्या
करोना प्रतिबंधक नियम शिथिल झाल्यानंतर शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. प्रशासन केवळ तिकिटांचे पैसे घेणार, मात्र सुविधा काहीच देणार नाही का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.