pune gramin : गोरगरिबांची मदत करून आशीर्वाद घ्या – भरणे

भवानीनगर: इंदापूर तालुक्‍यामध्ये रस्ते होतील, बांधकामे होतील, गटार लाइन होईल, सर्व स्तरावर प्रगती होईल.. ही प्रगती होण्याची थांबणार नाही; परंतु खऱ्या अर्थाने गोरगरीब बांधकाम मजूर यांना मदतीची गरज आहे व यासाठी इंदापूर तालुक्‍यातील बांधकाम मजूर नावनोंदणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी बांधकाम मजुराच्या घरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत. कोणत्याही देवाला लांबच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यापेक्षा या गोरगरिबांची मदत केली तर हे लाख मोलाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत, असे मत माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. इंदापूर) येथे भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम व मजुरी करणाऱ्यांना मोफत बांधकाम साहित्य किटचे वाटप व बांधकाम मजूर नाव नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी भरणे बोलत होते, याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, सचिन सपकळ, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, ऍड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, संजयभैय्या निंबाळकर, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, वीरसिंह रणशिंग, तानाजी पाटील, अभयसिंह निंबाळकर, प्रशांत पवार, वसंत जगताप, सागर भोईटे, तुषार सपकळ, आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे 40 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. कामगार कल्याण मंडळाकडे यामध्ये सामाजिक सुरक्षा, शिक्षण सहाय्य, आरोग्य, आर्थिक साह्य योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बांधकाम मजुरांना लाखो रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक मदत करण्यात येते.

मदतीसाठी नोंदणी आवश्‍यक
बांधकाम मजुराचा कामगार असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते तसेच नैसर्गिक मृत्यूला दोन लाखांपर्यंत मदत मिळते. घर बांधण्यासाठी मदत मिळते मजुरास 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंत मदत मिळते. गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत मिळते या योजनांचा लाभ घेण्यासाठी या मंडळाकडे मजूर कामगारांची नोंदणी आवश्‍यक आहे.