pune gramin : संघर्षाचे प्रेरणास्रोत म्हणजे शरद पवार

काटेवाडी – बारामती येथील राधेश्‍याम एन. आगरवाल टेक्‍निकल विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज बारामती येथे देशाचे माजी कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस अभीष्टचिंतन व कृतज्ञता सप्ताह म्हणून साजरा होत आहे. 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातीलच आज पहिल्या दिवशी शरद पवार यांचे कार्य या विषयावर ऍड.सुप्रिया बर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पवार यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.

पवार यांचे देशाच्या कृषी क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात व मुख्यतः रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीला असलेले योगदान व्यक्त केले. तसेच बारामतीच्या विकासात त्यांचे असलेले योगदान स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद मोहिते यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्रा. पोपट मोरे, उपमुख्याध्यापक कल्याण देवडे, पर्यवेक्षक सणस व इतर सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.