पुणे – पुरस्थिती उद्‌भवल्यास तातडीची मिळू शकणार मदत

पावसाळ्यासाठी आरोग्य विभागाची तयारी

पुणे – पावसाळ्यात मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येते. यामुळे शहरातील नदीकाठच्या भागात तसेच अनेक ठिकाणी नाल्यांच्या परिसरात पुरस्थिती उद्‌भवते अशा भागांतील अति जोखमीच्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करता यावे यासाठी त्यांची यादीच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी या पूर्वी पुरस्थिती उद्‌भवलेल्या भागांची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आली असून त्यानुसार हे काम सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहरच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी सोडले जाते. या शिवाय, मुळ-मुठा संगमानंतरही पाण्याचा स्तर वाढतो. त्यामुळे शहरात सिंहगड रस्ता, डेक्‍कन नदीपात्र, कामगारपुतळा, पाटील इस्टेटसह ज्या भागांत नाले आहेत त्या भागांत पाणीसाचून पुरस्थिती उद्‌भवते अशावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहोचण्यास उशीर झाल्यास नागरिकांच्या रोषाचा सामना प्रशासनास करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात प्रशासनाने तातडींच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून अति जोखीम असलेल्या नागरिकांची यादी करण्यात येणार आहे. त्यात बेडवर उपचार सुरू असलेले रूग्ण, गर्भवर्ती महिला, दिव्यांग, चालता न येणारे ज्येष्ठ नागरिक यांची यादी तयार केली जाणार आहे. त्यात त्यांच्या नावासह पत्ता आणि संपर्क क्रमांक घेतला जाणार आहे. ही यादी या भागांतील रुग्णालये तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने संकलीत केली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या भागात आपत्तीजनक स्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता असल्यास या नागरिकांचे सर्वात आधी स्थलांतर केले जाणार आहे. त्यासाठी माहिती संकलीत करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

आयुक्‍तांनीही दर्शविली सहमती
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या लोकसभेसाठी दिव्यांग मतदारांची यादी अशाच प्रकारे करण्यात आली होती. त्यानुसार, या मतदारांचे नाव ज्या केंद्रावर आहे त्या ठिकाणी व्हीलचेअर तसेच रॅम्प, मदतनिसांची संख्या निश्‍चित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर पावसाळ्यापूर्वी शहरातील अति जोखमीच्या व्यक्‍तींची यादी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्‍तांनीही त्यास सहमती दर्शविली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment