पुणे : वाघोलीत हिंद केसरी पै.अभिजित कटके यांचे जल्लोषात स्वागत

वाघोली : वाघोली गावचे सुपुत्र, महाराष्ट्र केसरी, भारत केसरी पैलवान अभिजीत कटके याने तेलंगणा येथील हैद्राबाद येथे झालेल्या ५१ व्या अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा कुस्तीगीर सोमवीर याचा पराभव करत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला. या कामगिरीसह अभिजीतने तेलंगणाच्या भूमित नवा इतिहास रचला असल्याने वाघोलीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हिंद केसरीच्या अंतिम सामन्यात अभिजीत कटके याने सोमवीरचा ५-० असा पराभव करत हिंदकेसरी किताब मिळवला. अभिजीतच्या विजयानंतर वाघोली तसेच पुण्यात जल्लोष करण्यात आला. यापूर्वी अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरी, भारत केसरी हे किताब जिंकले आहे. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी हे दोन्ही किताब मिळवणाऱ्या दीनानाथ सिंह, दादू चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीत कटके याने पटकावला आहे.

अभिजितच्या विजयानंतर वाघोली परिसरात ग्रामस्थांनी फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अभिजित कटके याचे वडील चंद्रकात तात्या कटके, आई ललिता कटके, व इतर यांनी घरी जल्लोष साजरा केला. वाघोली येथे घरी आल्यानंतर संपत आबा गाडे, व इतर ग्रामस्थ यांनी अभिजित कटके यांचा सत्कार केला.

“वाघोली सह महाराष्ट्राच्या कुस्ती या क्रीडा प्रकारात अभिजित कटके यांनी हिंद केसरी किताब पटकावून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांचा विजय हा एकट्याचा नसून त्यांचे आई-वडील, क्रीडा मार्गदर्शक, व कुस्ती शौकिनांचा हा विजय आहे.”

संपत आबा गाडे, जनसेवक, पुणे