पुणे : सिलिंडर्सचा अवैध साठा जप्त ; चिखली परिसरात प्रशासनाचा छापा

पुणे : पुणे शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे छापा टाकून मामा गॅस सर्व्हिस एजन्सीविरुद्ध गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण 707 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.

या कारवाईमध्ये ४ मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले १०५ सिलिंडर व रिकामे ६०२ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात ३५ लाख ७३ हजार ५४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत भिकचंद हिरालाल कात्रे याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, अशी माहिती गिते यांनी दिली.