PUNE : विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेनुसारच; शहरातील प्रमुख चार गणेश मंडळांचा निर्णय

पुणे -“विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्याच्या दृष्टीने कोणी काही वेगळा निर्णय घेतला असेल, तर त्याचे स्वागतच आहे. पण, टिळक पुतळ्यापासून लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होणारी अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही मंडळे नियोजित वेळेनुसारच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. यावेळी हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे बाळासाहेब मारणे आणि जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टचे भूषण पंड्या उपस्थित होते.
थोरात म्हणाले, “प्रशासनाला सहकार्य करत शिस्त पाळून विसर्जन मिरवणूक लवकर संपवण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे शक्‍य होत नाही. मानाच्या मंडळांच्या मिरवणुकीनंतर इतर मंडळे मार्गस्थ होतात. त्यामुळे ती मंडळे पुढे जाईपर्यंत इतरांना लवकर जाणे शक्‍य होत नाही. त्यासाठी आम्ही नेहमीच्या वेळेतच सहभागी होणार आहोत.’

“विसर्जन मिरवणुकीसाठी सायंकाळी सहभागी होत असलेल्या प्रमुख मंडळांनी केलेली सजावट आणि विद्युत रोषणाई हे सायंकाळनंतरचे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असते. ते पाहण्यासाठी लाखो भाविक जगभरातून येतात. त्यामुळे त्या सर्वांच्या भावनांचा विचार करता ठरलेल्या वेळेतच सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. तसेच सर्व प्रकारची शिस्त पाळत विसर्जन मिरवणूक होईल.” – पुनीत बालन, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

“श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्हाला त्यांच्यासोबत चार वाजता निघणे शक्‍य होत नाही. अन्य मंडळे आणि आमचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच आम्ही दरवर्षीप्रमाणेच मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत रोषणाईचे गणपती पाहण्यासाठी अंधार तरी पडायला हवा, अशीच आमची भूमिका आहे.” – अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ

मंडळांचा चेंडू पोलिसांच्या कोर्टात

“आम्ही सायंकाळी सहा वाजताही निघण्याचा प्रयत्न करू. आम्ही रात्री साडेआठ वाजताही समाधान चौकात येऊ शकतो. परंतु त्यासाठी पोलिसांनी आम्हांला टिळक पुतळा ते लक्ष्मीरस्ता हा मार्ग मोकळा करून द्यावा,’ असे स्पष्ट करत या चारही मंडळांनी पोलिसांच्याच कोर्टात चेंडू टोलवला आहे. त्यामुळे मिरवणूक लवकर संपवण्याच्या दृष्टीने पोलीस आता रस्ता “क्‍लिअर’ करून देण्यासाठी काही पुढाकार घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.