PUNE: दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर करडी नजर

पुणे – महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात होणारया दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर भरारी पथकाची करडी नजर राहणार आहे.

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. खासगी क्लासेस् बरोबर शाळा, महाविद्यालयांचे टाय्-अप असल्यामुळे विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांत उपस्थित राहण्याएवजी खासगी क्लासेसमध्ये उपस्थित राहण्याला अधिक प्राधान्य देतात. शाळा, महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षा नीट घेतल्या जात नसल्याची बाब अनेकदा उघड झालेली आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांमधील अनागोंदी दूर करण्यासाठी पुणे बोर्डाकडून शाळा, महाविद्यालयांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. यंदा पहिल्यांदाच परीक्षांवर भरारी पथकाचे लक्ष राहणार आहे. भरारी पथकात बोर्डाचे अधिकारी, अनुभवी शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी स्वयंम अर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयात अनुदानित शिक्षकांच्या बाह्य नियामक म्हणून नियुक्त्या करण्यात येणार आहे.

स्वयंम अर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनाही बाह्य नियामक म्हणून काम करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा ज्या दिवशी होणार असेल त्याच दिवशीच बाह्य नियामकांच्या उपस्थितीत गुण भरावे लागणार आहेत. ओएमआर शीटची पध्दत बंद होणार आहे. पुणे बोर्डाच्या मंजुषा मिसकर, विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी परीक्षांसाठी योग्य नियोजन करण्यासाठी कार्यशाळा घेण्याला प्राधान्य दिलेले आहे.