Pune: पैसे, दारूच्या अवैध वापरावर लक्ष ठेवा; कडक तपासणीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे आदेश

पुणे – निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत खर्चविषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक कमलेश मखवाना यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवण्यासह विविध पथकांच्या माध्यमातून निवडणुकीत पैसे, दारू आदींच्या अवैध वापरावर लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी दिले.

या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, सहायक खर्च निरीक्षक अस्मिता देशमुख, स्वप्निल खोल्लम आदी उपस्थित होते. मखवाना यांनी मतदारसंघात पाषाण- सुस रोड येथील वरदायिनी सोसायटीजवळ उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट दिली.

तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला. एक खिडकी कक्ष, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष यांचे कामकाज तपासून कामाबाबत समाधान व्यक्त केले. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले.

वाहनांच्या तपासणीवेळी चित्रीकरण

निवडणुकीशी संबंधित उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चाबाबत वाहनांची योग्यरीत्या तपासणी करून सर्व वाहनांची तपासणी करताना चित्रीकरण करावे, अवैधरीत्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर कडक लक्ष ठेवण्यात यावे, मतदारसंघात अंतर्गत भागात वाटप होणाऱ्या पत्रकांबाबत माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमार्फत विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना मखवाना यांनी या वेळी दिल्या.