Pune: ‘खडकवासला’ होणार प्रदूषणमुक्त

पुणे – खडकवासला धरणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन सरसावले आहेत. धरणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी “एसटीपी’ अर्थात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.

खडकवासला धरणापासून पानशेतपर्यंत धरणाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बांधकामे तसेच नागरी वस्ती वाढली आहे. मात्र, त्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट मुठा नदीत सोडले जाते. यामुळे खडकवासला धरण प्रदूषित झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका आणि पीएमआरडीए यांनी संयुक्त पाऊल उचलले आहे.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे 23 गाव येतात या गावांची लोकसंख्या अल्प असली, तरी गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, बांधकामे झालेली आहेत. या बांधकामांनी सांडपाणी शुद्ध करूनच ते नदीत सोडणे अपेक्षित आहे. यासाठी खर्च जास्त असल्याने हे व्यावसायिक त्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे सांडपाणी थेट खडकवासला धरणात येते आहे.

तेथूनच पुणे शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने प्रदूषित पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पाण्याला अटकाव घालण्याची मागणी शासनाकडे वारंवार केली जात आहे. मात्र, ग्रामपंचायतींना एसटीपी प्रकल्पासाठीचा खर्च परवडणारा नसल्याने दुर्लक्ष केले जाते. अन्यथा शासनाने निधी द्यावा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शासनाने महापालिका आणि पीएमआरडीए यांना संयुक्त प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत.

वाढती बांधकामे जैवविविधतेच्या मुळावर

खडकवासला धरण भागात अनिर्बंध बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांनाही मर्यादा घालण्याची मागणी केली जात आहे. हा भाग डोंगरांचा असल्याने तसेच या भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने मोठी बांधकामे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढल्याने या जैवविविधतेला धोका पोहोचत आहे.

“कालवा समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानुसार महापालिका आयुक्त यांची चर्चा करून लवकरच पीएमआरडीएसोबत बैठक बोलावून संयुक्त आराखडा करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमातूनच आराखडा करून त्याची अंमलबजावणी ही कामे केली जातील. त्यासाठी आवश्यक यंत्रणा पीएमआरडीएकडे नाही. तर दोन्ही संस्था या प्रकल्पाचा प्रत्येकी 50 टक्के खर्च उचलतील.” – कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मनपा