Pune: ‘किरण – अ रे ऑफ होप’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

पुणे  – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे आयोजित लघुपट स्पर्धेचे पुरस्कार वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे करण्यात आले. यात सात विजेत्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यात भूषण मेहरे यांच्या “किरण – अ रे ऑफ होप’ या लघुपटाला प्रथम क्रमांकाचे २ लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या लघुपटातून एलजीबीटीक्यू समूहाच्या अधिकारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

द्वितीय पुरस्कार श्री बिभुज्जल राज कश्यप यांच्या आसामी भाषेतील “मुखाग्नी- द क्रिमेशन’, तर, तृतीय पुरस्कार नितीन सोनकर यांना हिंदी भाषेतील “राइट टू फ्रीडम’ या लघुपटाला प्रदान करण्यात आला. यासह चार लघुपटांना “सर्टिफिकेट ऑफ स्पेशल मेन्शन’ देण्यात आले. यामध्ये “ग्लास ऑफ ह्युमॅनिटी’, “हॅरॅसमेंट ऑफ दीपशिखा’, “नरागम – हेल’ आणि “रहस’ या लघुपटांचा समावेश आहे.

यावेळी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यास मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राजीव जैन आणि विजयाभारती सयानी, सरचिटणीस भरत लाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारितोषिक मिळालेल्या चित्रपटांमध्ये ट्रान्सजेंडर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुले आणि महिला यांच्या हक्कांच्या प्राप्तीतील आव्हानांसह विविध विषयांना स्पर्श केला आहे. 2023 च्या स्पर्धेत 139 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून या सात लघुपटांची निवड करण्यात आली आहे.