कांद्यापाठोपाठ द्राक्षानेही रडविले!

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर अघोषित निर्यातबंदी लादल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तर आता द्राक्ष निर्यातीच्या खर्चात वाढ झाली असल्यामुळे द्राक्षाची गोडी निर्माण होण्यापूर्वीच द्राक्षाचे भाव कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. बांग्लादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने जुन्नर-आंबेगाव तालुक्यातून द्राक्षाची निर्यात घटली आहे.

सुएझ कालव्यामार्गे युरोपला द्राक्ष पाठविण्यासाठी प्रतिकंटनेर 1400ते 1700 डॉलर इतका दर होता; परंतु हा मार्ग बंद आहे. काही शिपिंग कंपन्यांनी द्राक्ष प्रतिकंटेनरला 3800 ते 4200 डॉलर इतका दर केला आहे. द्राक्ष निर्यातीसाठी खर्च वाढल्याने द्राक्ष व्यापार्‍यांनी बागायतदारांकडून 60 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने द्राक्ष खरेदी केली असल्याने त्याचा आर्थिक फटका तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे.

द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आंबेगाव-जुन्नर तालुक्यात यंदा 1120 हेक्टरवर द्राक्षाची लागवड झाली असून सर्वाधिक 1050 हेक्टर लागवड जुन्नर तालुक्यात झाली आहे. यंदा द्राक्षाला अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादक चिंतेत आहेत. जुन्नर तालुक्यात द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली असून 12 कंटेनरमधून 120 टन द्राक्ष चीन देशात निर्यात झाली आहे. तर आंबेगाव तालुक्यातील 70 हेक्टर वरील द्राक्ष निर्यात 15 फेब्रुवारी नंतर दुबई येथे सुरू होणार आहे. शेजारील नाशिक जिल्ह्याची रसाळ द्राक्ष युरोपला पोहोचली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या वर्षापासून द्राक्ष निर्यात संकटात सापडली आहे. त्या संघर्षाचा फटका द्राक्ष निर्यातीला बसला आहे. बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात निर्यात होणार्‍या द्राक्षावर भरमसाट आयात शुल्क असल्याने निर्यातीचा टक्का घसरला आहे. तर स्थानिक बाजारपेठांमध्ये द्राक्षाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे निच्चांकी दराने द्राक्ष हंगामाला सुरवात झाली आहे. यापूर्वी हंगामाच्या सुरवातीला द्राक्षाचे दर तेजीत असतात. परंतु यंदा दर घसरल्याने उलट स्थिती निर्माण झाली आहे. माणिक चमन वाणाच्या द्राक्षांना 30 ते 42 रुपये दर मिळत आहे. काळ्या रंगाच्या द्राक्षांना 70 ते 100 प्रति किलो रुपये दर मिळत आहेत

विदर्भातील संत्र्याला अनुदान मात्र…
केंद्रात विदर्भातील नेत्यांचे वजन असल्याने विदर्भातील संत्र्याला अनुदान मिळत आहे. मात्र, जुन्नर-आंबेगावातील द्राक्षाला अनुदान मिळत नसल्याने द्राक्षाचे दर घसरण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना वाटत आहे.

बांग्लादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ केल्याने जुन्नर-आंबेगावातील निर्यात घटली आहे. दर कमी झाल्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. बांग्लादेशात सध्या द्राक्षांवर 106.76 रुपये प्रतिकिलो आयात शुल्क आकारले जात आहे. बांग्लादेशात निर्यात होणार्‍या संत्र्यांवरील आयातीवर शुल्काच्या 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे संत्र्यांवरील अनुदानाप्रमाणेच द्राक्षावरील आयात शुल्काच्या 50 टक्के अनुदान मंजूर करावे. जेणेकरून बांग्लादेशात द्राक्ष निर्यात पुन्हा सुरू होण्यास मदत होऊन उत्पादकांना फायदा होईल.
– गणेश वाघ, द्राक्ष उत्पादक, पिंपळवंडी

अनेक संकटावर मात करून पोटच्या गोळ्याप्रमाणे द्राक्षबागा जगवल्या. अवकाळी पाऊस, असमतोल हवामानाशी झुंज देत द्राक्षबागा फुलविल्या. सोसायट्यांचे कर्ज काढून लाखो रुपये भांडवल द्राक्षबागेत गुंतविले. अपेक्षित दर मिळत नसल्याने खर्चही निघेल की नाही, ही भीती वाटते. एकाला तुपाशी अन्, दुसरा उपाशी अशी दुहेरी भावना मायबाप सरकारने ठेवू नये. द्राक्षाचे उत्पादन घटले असून खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे.
– जयसिंग वायकर, द्राक्ष उत्पादक, गुंजाळवाडी

द्राक्ष खरेदीदारांचा वानवा असून शेतकरी खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहे. दुबई बाजारपेठेत द्राक्षांचे भाव कोसळले असून सलग तीन वर्षापासून द्राक्ष बागायतदार अवकाळी पाऊस व धुक्याने अडचणीत आला आहे. चालू वर्षी व्हाईट द्राक्षांना फारच कमी मागणी असून रंगीत द्राक्षांना बरी मागणी आहे
– महादेव वाघ, द्राक्ष उत्पादक, शेतकरी