पुणे : लोकलचे प्रवाशी वाढले; उत्पन्न पाच कोटीने वाढले

– प्रवासी संख्या ३३ टक्क्यांनी वाढली
पुणे –
पुणे-लोणावळा लोकलला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात तब्बल २ कोटी ९ लाख ७ हजार प्रवाशांनी लोकलचा प्रवास केला असून, त्यातून पुणे रेल्वेला १३ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशी संख्या ३३ टक्‍क्यांनी वाढली आहे.

पुणे रेल्वे विभागात पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड या दोन मार्गावर लोकल सेवा सुरू आहे. त्यापैकी पुणे ते लोणावळा दरम्यान ४० लोकल धावतात. तर, पुणे ते दौंड मार्गावर मेमूच्या माध्यमातून लोकल सेवा सुरू आहे. या दोन्ही मार्गावरील लोकल सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात शिवाजीनगर येथून लोणावळासाठी सुरू केलेल्या लोकल सेवाला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे या पुणे लोणावळा मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

दौंड लोकलची मागणी
पुणे ते दौंड दरम्यान कामगार वर्ग, विद्यार्थी, व्यापारी मोठ्या संख्येने प्रवास करतात. परंतु पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे मिळेल त्या गाडीने प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येते. त्यामुळे पुणे ते दौंड दरम्यान उपनगरीय (ईएमयु) लोकल सेवा चालू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

* जानेवारी ते डिसेंबर २०२२ – प्रवाशी संख्या १ कोटी ५६ लाख ७ हजार तर एकूण उत्पन्न ९ कोटी ३३ लाख रुपये
* जानेवारी ते डिसेंबर २०२३ – प्रवाशी संख्या २ कोटी ९ लाख ७ हजार तर एकूण उत्पन्न १३ कोटी १८ लाख रुपये