बाजारपेठा “अनलॉक” : पहिल्याच दिवशी पुणेकरांची खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी

पुणे – हॉटेल व्यावसायावरील हटवलेले निर्बंध…श्रावणाचा पहिलाच दिवस…त्यामुळे रविवार पेठ, मंडई, तुळशीबाग येथे पुणेकरांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. परिणामी, मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, बेलबाग चौकात सुरू असलेले ड्रेनेजचे काम आणि बंद सिग्नलमुळे कोंडीत भर पडत होती.

पुणे शहरातील करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदरही घटला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या परिस्थितीत केलेले नियम शिथिल केले आहेत. दुकान, हॉटेल्स उघडण्यास पूर्वी दुपारी चारपर्यंत परवानगी होती.

मात्र, आता दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल रात्री दहा पर्यंत सुरू राहणार आहे. दुपारी चारनंतर मोकळे दिसणारे रस्त्यावर गजबज सुरू झाली. श्रावण महिन्यात विविध सण, व्रत असतात. त्यामुळे मंडई येथे फळे, भाजीपाला आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

तर, रविवार पेठेत राखी, कपडे, पंधरा ऑगस्टचे झेंडे खरेदीसाठी एकाच वेळी गर्दी झाली. तर तुळशीबागेत कपडे, महिलांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. परिणामी, गर्दी झाली. मंडईतील दोन्ही पार्किंगही फुल झाले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. तुलनेने लक्ष्मी रस्त्यावर गर्दी कमी होती. मात्र, नेहमीच्या तुलनेत वर्दळ जास्त होती.

बेलबाग चौकात महापालिकेकडून ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्याच्यामुळे रस्ते अरूंद बनले आहेत. त्यातच लोकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
– आर.एस.फडके,
पोलीस निरीक्षक, फरासखाना वाहतूक विभाग.

ग्राहकांना खरेदीसाठी वेळ मिळत आहे.चांगली गर्दी झाली आहे.
आता श्रावणामुळे सण-उत्सव सुरू होत आहेत. आगामी गौरी-गणपती, नागपंचमी, राखीपौर्णिमा, 15 ऑगस्ट असे मोठे उत्सव आहेत. बाजारात प्रतिसाद चांगला आहे.
– नितीन पंडित,
अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन.