Pune: शिळे जेवण पुरवणाऱ्या मेस चालकाला दंड; पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीतील प्रकार

पुणे – मुंबई विद्यापीठांमधील ४० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना खराब पिठाच्या चपात्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर संतप्‍त विद्यार्थ्यांनी मेस मालकाला जाब विचारला. चपात्या आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडले आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने मेस चालकाला पाच हजार रुपये दंड केला आहे.

विद्यापीठातील खानावळीत अजूनही जेवणाच्‍या दर्जात सुधारणा झालेली नाही. सोमवारी विद्यार्थ्यांनी चपात्या खराब असल्याने जेवण अर्धवट सोडले. त्यात मेस चालकांच्या एका कर्मचाऱ्याबरोबर विद्यार्थ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. चपाती आणि भाजीसह सर्व आंबट लागत आहे. चपात्यांचे पीठ काल मळलेले असावे, असा अंदाज विद्यार्थ्यांकडून वर्तवण्यात आला आहे.

भाजीचा दर्जा चांगला नाही. मेस कर्मचाऱ्यांनी डोक्याला कॅप व हातात मोजे घातलेले नाही. स्वच्छतेचे नियम पाळले जात नाही, याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. दरम्‍यान, जेवण घराब लागत असल्याबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यावर प्रत्यक्ष रिफेक्ट्री भेट देऊन पाहाणी केली. मेस चालकाला जेवणात सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शिवाय, दंड आकारण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.