PUNE: मेट्रोची स्थानके उजळणार सौर उर्जेने

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पातील दहा स्थानकांसाठीच्या दैनंदिन वापरासाठी महामेट्रोकडून सौर उर्जेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी या स्थानकांसह वनाज डेपो आणि रेंजहिल डेपो येथे ४.३ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या सौर ऊर्जा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर स्थानके आणि डेपोच्या संचलनासाठी होणार आहे. पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ संचलन व प्रणाली संचालक विनोदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक राजेश द्विवेदी, डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह जमतानी प्रोझ्युमर्स सोलर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनुप झमतानी, वीरेंद्र भागवत उपस्थित होते. महामेट्रोकडून २०२२ पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून सुमारे १५,५५७ युनिट वीज निर्मिती होणार असून महामेट्रोचा वर्षाला तब्बल ६.३३ कोटींचा खर्च वाचणार आहे.

या स्थानकावर बसविली यंत्रणा

सौर उर्जा यंत्रणा बसवण्यात आलेल्या स्थानकांमध्ये वनाज, आनंद नगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी या स्थानकांचा समावेश आहे. यासह रेंजहिल डेपो, हिल व्ह्यू पार्क डेपो वनाज येथे सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मितीचे पॅनेल बसविण्यात आलेले आहे .

अशी आहे मेट्रोची सेवा

पर्पल मार्गिकेवरील पीसीएमसी ते फुगेवाडी (७ किमी, ५ स्थानके) आणि एक्वा मार्गिकेवरील वनाज ते गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक (५ किमी, ५ स्थानके) या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ०६ मार्च २०२२ रोजी तर फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय (६.९१ किमी, ४ स्थानके) आणि गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक ते रुबी क्लिनिक ( ५.७५ किमी, ७ स्टेशन) या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर रूबी हाॅॅल ते रामवाडी आणि सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या मार्गावरील सेवा मार्चअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

“महामेट्रो प्रशासन शक्य तितकी हरित ऊर्जा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.” – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो