Pune: कामगारांना बांधून ठेवून २० लाखांचे मोबाईल पळविले

पुणे – टिळक रोडवरील एका मोबाईलच्या स्टोअररूमधील कामगारांना चाकूच्या धाकाने बांधून ठेवत दुकानातील २० लाख ५० हजारांचे मोबाईल चोरून पळालेल्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यातील दोघेजण मुंबईतील असून एकजण चिंचवडमधील आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.

झबीउल्लाह नबीउल्लाह खान (२८, रा. घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (२०, रा. मुंबई), कमलेश विश्वास मोरे (थेरगाव, पिंपरी चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोन आठवड्यापुर्वी टिळकरोड परिसरात ही घटना घडली होती. याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, टिळकरोड भागात मोबाईलचे स्टोअर रूम आहे. आरोपी झबीउल्लाह, सोहेल आणि कमलेश हे स्टोअर रुममध्ये चोरी करण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे असेलल्या तिघा कामगारांना त्यांनी धमकाविले. चाकूचा धाक दाखवूून त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर दुकानातील आयफोन, वनप्लस, सॅमसंग कंपनीचे तब्बल २० लाख ५६ हजारांचे फोन घेवून चोरटे पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक दिपाली भुजबळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकाला सूचना दिल्या. त्यानूसार तांत्रिक तपासावरून आरोपी हे कोंढवा भागात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून गुन्हा उघडकीस आणला

गुन्ह्यातीलनिष्पन्न आरोपीत हे मुंबई व पुणे असे प्रवास करत असल्याने त्यांचा शोधणे कठीन जात होते. परंतु विश्रामबाग पोलीस ठाणे तपासपथकाने आरोपीस कोंढवा परिसर पुणे येथे सापळा रचुन ७२ तासांत अटक करुन गेलेला माल पुर्णपणे हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ संदिप सिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली दिपाली भुजबळ, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), अरुण घोडके, (पोलीस निरीक्षक,गुन्हे), तसेच मनोज बरुरे(पोलीस उपनिरीक्षक), पोलीस अंमलदार राकेश गुजर, रेवन कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने, अर्जन थोरात आणि नितीन बाबर यांनी केलेली आहे.