PUNE: मुंढवा जॅकवेलच्या वीजबीलाचा भार पालिकेवर; महावितरणचा कारभार

पुणे –  शहरात निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रीया करून ते पुन्हा शेतीला देण्यासाठी महापालिकेकडून मुंढवा येथे जॅकवेल उभारण्यात आला आहे. जॅकवेलला महावितरणकडून एप्रील २०२३ पूर्वी शेतीच्या दराने वीज बील आकारण्यात येत होते. मात्र, महावितरणकडून त्यात बदल करण्यात आला असून आता थेट सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी आकारला जाणार दर लागू करून महावितरणने महापालिकेस शाॅक दिला आहे.

कृषी आकारणीसाठी आधी प्रतीयुनिट २.२८ पैसे दर होता तर वापराचा प्रकार बदलण्यात आल्याने तब्बल ७.५३ रूपये दर आकारण्यात आला आहे. त्यामुळे, या प्रकल्पाचा महापालिकेचा वीज खर्च वर्षाला तब्बल १४ कोटींवर गेला असून महापालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे.

वर्षाला साडेसहा टीएमसी पाणी

पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत झालेल्या करारानुसार महापालिकेने दरवर्षी प्रक्रिया केलेले साडेसहा टीएमसी पाणी देणे बंधनकारक आहे. हे पाणी मुंढवा येथे बंधारा बांधून साठविण्यात येऊन तेथून ते जॅकवेलद्वारे पंपिगकरून जुना मुठा कलावा ( बेबी कालवा) मधून जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येते. या जॅकवेलसाठी महापालिकेने महावितरणकडून वीज जोडणी घेतली आहे. यासाठी आधी महापालिकेस कृषी आकारणीसाठी प्रतीयुनिट २.२८ पैसे दराने वीज दिली जात होती. यासाठी वर्षाला महापालिकेस सहा ते सात कोटींचे बीज बील मोजावे लागत होते.

मात्र, एप्रील २०२३ पासून सार्वजनिक पाणीपुरवठा प्रमाणे वीज आकार प्रती युनिट ७.५३ केल्याने महापालिकेवर या प्रकल्पासाठी प्रतियुनीट ५.२५ पैसे इतका आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान, पाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी नव्हे तर शेतीसाठी देण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. मात्र, महावितरणकडून महापालिकेचा युक्तीवाद नाकारत नियमानुसारच सुधारीत दर आकारण्यात येत असल्याचे सांगत महापालिकेस दिलासा देण्यास नकार दिला आहे.