पुणे – महापालिका लस उपलब्ध करणार

पुणे -राज्य सरकारने दुजाभाव केला, तरी महापालिका पुणेकरांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणार, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
लसीकरणासाठी जागतिक निविदांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, मतदान केंद्रनिहाय लसीकरण सुरू करावे, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये उभारावीत, पोस्ट कोविड सेंटर सुरू करावीत आदी मागण्या मुळीक यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केल्या.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक सुशील मेंगडे, अजय खेडेकर, मंजूषा खर्डेकर, हरिदास चरवड, दिलीप वेडे पाटील, आनंद रिठे, रूपाली धाडवे, उज्ज्वला जंगले आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष झाले गप्प
बैठकीनंतर शहराध्यक्ष मुळीक यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, या बैठकीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना त्यांची तारांबळ उडाली. लसीकरणाबाबत आढावा बैठक घेतली, तर “शहरासाठी आतापर्यंत शासनाकडून किती लस आल्या, तसेच किती गरज आहेत’ असे विचारताच त्यांनी उत्तर दिले नाही. या उलट शासन दुजाभाव करत असल्याचेच ते वारंवार सांगत होते, तर नियमितपणे बैठका घेऊन आणि सत्ताधारी म्हणून आदेश देऊनही लसीकरणाबाबत स्थिती सुधारत नसल्याने बैठका घेऊन काय होणार? यावरही त्यांनी उत्तर दिले नाही.