Pune News : मालमत्तेच्या वादातून करणी केल्याप्रकरणी मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा

पुणे – मालमत्तेच्या वादातून आईची साडी चोरुन नेऊन त्याला अंडी, टाचणे लावून, करणी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी मांत्रिकासह सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जनवाडीत राहणाऱ्या एका 28 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांता सुरेश चव्हाण (वय 70), गिरीश सुरेश चव्हाण (वय 35, दोघे रा. जनवाडी),

संगीता सुपेकर (वय 45), स्वप्निल सुपेकर (वय 23), सोनल प्रविण सुपेकर (वय 30), देवऋषी स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार जनवाडी येथे 11 व 13 ऑगस्ट रोजी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची आजी कांता चव्हाण या जनवाडी जनता वसाहतीत शेजारी शेजारी रहातात.

फिर्यादी यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून त्यांची सावत्र आई कोथरुडमध्ये राहतात. फिर्यादी यांच्या पंजीच्या नावावर असलेल्या दोन खोल्यांपैकी एक आईच्या नावावर व दुसरी मावशीच्या नावावर करणार होती. त्यावरुन त्यांच्या वाद आहे.

तसेच फिर्यादी यांनी मामावर करणी केल्याने त्याचे लग्न होत नाही, असे फिर्यादीच्या आजी व मामाला वाटत असल्याचे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. फिर्यादी यांच्या आईची घराबाहेर वाळत घातलेली साडी चोरीला गेली. त्यांनी तेथील सीसीटीव्ही तपासले.

तेव्हा त्यांची आजी व तिच्याकडे भाड्याने राहणाऱ्या मुलीने ती चोरुन नेल्याचे दिसले. 13 ऑगस्ट रोजी फिर्यादी हे शेजारील आजीच्या घरात गेले. तेथे त्यांची आई, मावशी, काकु यांचे फोटो ठेवून त्यांचे फोटो व आईचे साडीचे बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबु, भेळ, भात काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती, कापूर पदार्थ ठेवले होते.

देवऋर्षी मंत्रोउच्चार करीत होते. तेव्हा फियार्दी यांनी माझ्या आईची साडी घेऊन काय करता, असे विचारले. आजी कांता चव्हाण हिने तुम्हाला भिकेला लावले, आमची मालमत्ता घेतली. आम्ही तुमच्यावर करणी करुन तुम्हाला मारुन टाकणार आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जादुटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करीत आहेत.