pune news । महिलादिनानिमित्त कॉसमॉस आदिशक्ती पुरस्काराचे वितरण

पुणे – नुकत्याच ८ मार्च रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने ‘कॉसमॉस आदिशक्ती’ पुरस्काराचे वितरण बँकेचे मुख्य कार्यालय कॉसमॉस टॉवर येथे समारंभपूर्वक करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान आदिशक्ती पुरस्कार देऊन करण्यात आला.

यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी, नीलकांती पाटेकर, नीलम एदलाबादकर, डॉ. विदुला सोहोनी, दीपा पातुरकर आणि हेमा यादव यांचा समावेश होता. बँकेच्या विविध राज्यातील शाखांमध्ये अशा प्रकारचा समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान शाखा स्तरावर करण्यात आला.

खासदार मेधा कुलकर्णी यावेळी बोलताना म्हणाल्या की, “स्त्रियांना घर आणि करिअर करताना पुरूषांनी साथ देणं, सहकार्य करणं फार महत्वाचं आहे. त्यादृष्टीने स्त्री- पुरूष समानता सर्वत्र असणे आवश्यक आहे. ‘कॉसमॉस आदिशक्ती पुरस्कार’ हा मला आनंद देणारा पुरस्कार असून कॉसमॉस बँकेचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

कॉसमॉस बँक विश्वास आणि आपुलकीची सेवा देत असताना लोकांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेत आहे.” यावेळी विविध पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, “सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. धैर्य, चिकाटी, निष्ठा आणि परिश्रम या गुणांच्या जोरावर महिला आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. आमच्याही बँकेच्या प्रगतीत महिला अधिकारी वर्गाचा खूप मोठा वाटा आहे. ”

‘हिरकणी पुरस्कार’ हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कॉसमॉस बँकेत नोकरी करणाऱ्या महिला वर्गास प्रदान करण्यात आला. तसेच बँकेबरोबर बँकींग करणाऱ्या तीन पिढयांसाठी असलेला ‘नाते आपुले शतकाचे या पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महिलादिनाच्या निमित्ताने महिलांकरिता विविध स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धेस महिला कर्मचारी वर्गाने भरघोस प्रतिसाद दिला. बँकेच्या संचालिका अनुराधा गडाळे यांच्या संकल्पनेतून महिलादिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर समारंभाप्रसंगी उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे व संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. प्राची घोटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.