Pune News : एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल, मोहनवाडीच्या प्रांगणात मराठी राज्यभाषा गौरवदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून ग्रंथदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा उगम ते आजपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.

विद्यार्थ्यांनी ओव्या , भारुडे, पोवाडे , कविता व मजेशीर उखाणे यांतून मराठी भाषेचे साहित्य संपन्नता उपस्थितांसमोर सादर केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळेच्या आवारात छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले.

यामध्ये प्रसिद्ध लेखकांची ,कवींची, ऐतिहासिक व छान छान गोष्टींची पुस्तके ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रातले प्रसिद्ध गड-किल्ले यांचे प्रदर्शनी मांडण्यात आले होते. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती व मराठी यांचे दर्शन या प्रदर्शनात घडले.

तसेच बुधवारी (दि.२८फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत शाळेमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ देखील साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्यावतीने भव्य असे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी जैविक आणि रासायनिक कचऱ्याचे विघटन व स्वच्छता, वीज, मोटार वर चालणारे नवीन उपक्रम सादर केले.

तसेच प्रदूषण, गुरुत्वाकर्षण ,विज्ञान आणि तंत्रज्ञान, अवकाशातील चंद्रयान भ्रमण व परिक्रमा, पर्यावरण, विज्ञानातील गमती जमती या विषयावर प्रकल्प सादर करून आपला सहभाग नोंदविला व विज्ञानाचे गमतीदार खेळ सादर केले . तसेच भारतीय शास्त्रज्ञांचे, संशोधकांचे व आतापर्यंत झालेले संशोधन यांचे तक्ते प्रदर्शनात मांडले होते.

याप्रसंगी सीनियर सायंटिस्ट वेंकटेशन व के .एन . चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण पाहून ते भारावून गेले. आजचे विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतात, नवीन शोध करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे हे पाहून मला या विद्यार्थ्यांचा अत्यंत अभिमान वाटतो या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे स्तुत्य कौतुक केले.

याप्रसंगी शाळेचे संस्थापक लक्ष्मणराव देवकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे तोंडभर कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला, कल्पकतेला व सृजनात्मक विचार करण्याला नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये चिकित्सक वृत्ती ,जिज्ञासू प्रवृत्ती जागृत ठेवावी व सृजनात्मक विचार करावा त्यामुळे शाळेचेच नव्हे तर देशाचेही नाव लौकिक वाढेल असे ते म्हणाले.