Pune News : कॉसमॉस बँकेच्या उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार यांची निवड

पुणे – कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रविणकुमार गांधी यांनी नवीन संचालकांना संधी देण्याकरिता उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्त पदावर, बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये, बँकेचे संचालक सीए यशवंत कासार यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी सांगितले.

यशवंत कासार हे सनदी लेखापाल असून सर्टिफाईड इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिटर, सर्टिफाईड इन गव्हर्नन्स् ऑफ एंटरप्राईज आयटी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल अकाउंटंटस् लंडन येथील फेलो सदस्य आहेत.

सीए कासार इंन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे २०१९-२५ या कालावधीसाठी प्रादेशिक परिषद सदस्य आहेत. कर, कायदे व वित्त क्षेत्रातील तज्ञ आहेत. सन २०१९ पासून कॉसमॉस बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. चार्टर्ड अकाउंटंट इन को-ऑपरेटीव्ह बँक्स्चे (सीएसीओबी) सीए कासार सचिव आहेत.

तसेच बँकेच्या अंतर्गत सेवक संघटनेने कळविल्यानुसार सेवक प्रतिनिधी पदावर बँकेचे व्यवस्थापक उदय लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेले हे बी.कॉम, एल.एल.बी. असून गेली ३० वर्षे बँकेमध्ये कार्यरत आहेत. कॉसमॉस बँक सेवक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते.