Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता.

गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.

त्याच्याकडून यामाहा एफझेड, हॉन्डा स्प्लेंडर, होंडा पेंशन, टीव्हीएस विक्टर अशा एकूण ०७ दुचाकी जप्त करण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या घटनांच्या पाश्‍वभूमीवर गस्त वाढवण्यात आली होती.

तसेच चोरीला गेलेल्या एका पल्सर गाडीसंदर्भात तपासही सुरु होता. दरम्यान हददीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार हर्पल दुडम , प्रमोद भोसले व अक्षयकुमार याबळे यांना खबर मिळाली की, साधारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रभूषण चौकातून गाडी चोरणारा व्यक्ती गाडीसह भांडेआळी रविवार पेठ येथे थांबला आहे.

पोलीस पथकाने तातडीने तेथे धाव घेऊन दुचाकीसह उभ्या असलेल्या साहूला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीसंदर्भात विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्याला पोलिशी खाक्या दाखवल्यावर त्याचेकडून २ लाख ३५ हजार रुपयांच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई उपायुक्त संदिपसिंह गिल यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराय राउत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, अजीज बेग, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाचळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, , लखन डावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, नितीन जाधव, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, यांचे पथकाने केली.