पुणे | पालखी मिरवणुकीने शिवजयंती उत्साहात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तिथीप्रमाणे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी चौकात मंडप घालून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती, शिवछत्रपतींची प्रतिमा पालखी रथात ठेवून केलेले पूजन, रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, ढोल- ताशांचा गजर आणि शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण अशा शिवमय वातावरणात तिथीप्रमाणे शिवजयंतीउत्सव गुरूवारी साजरा करण्यात आला.

याशिवाय विविध संस्था, संघटनांनी एसएसपीएमएस, तसेच कोथरूड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महाराजांना अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या व्यापारी उद्योग सेलचे उपाध्यक्ष अभिजीत शहा यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी सुशीलककुमार जैन, विनोद करताल आदी उपस्थित होते. याशिवाय याच पक्षाच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महाराजांच्या तैलचित्राला मतदार संघाचे अध्यक्ष नरेश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी मतदारसंघाचे ब्लॉक अध्यक्ष दिनेश अर्धाळकर, शब्बीर शेख, आयाज शेख आदी उपस्थित होते.

गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले. या वेळी श्री धाम वृंदावन येथील अखिल भारतीय साध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री पू. साध्वी प्रज्ञा भारती, रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश ऊर्फ नानासाहेब जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, रवींद्र भन्साळी, संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे, विजय चौधरी, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, सचिन भोसले, नीलेश कांबळे आदी उपस्थित होते.