पुणे: ‘कॉकटेल’ नाही, आधी घेतलेल्या लसीचाच “बूस्टर’

तिसऱ्या डोसबाबत सगळ्या तर्क, चर्चांना तूर्त विराम

पुणे  – आधी घेतलेल्या कंपनीचाच “बूस्टर’डोस दिला जाणार असून, कोणतीही “रिस्क’ घेतली जाणार नसल्याचे, आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना “बूस्टर’ डोस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 25 रोजी जाहीर केला. मात्र, “बूस्टर डोस’ हा कॉकटेल असणार आहे की, आधीच्या घेतलेल्या कंपनीचाच असणार आहे, याविषयी बरेच तर्क लढवले जात होते. वेगवेगळ्या कंपनीच्या डोसचे “कॉकटेल’ केल्याने त्याची परिणामकारकता जास्त असल्याची मध्यंतरी बरीच चर्चा सुरू होती.
मात्र, पहिला डोस कोवॅक्‍सिन घेतलेल्या व्यक्तीला दुसराही तोच डोस देण्यात आला होता.

कोविशील्डच्या बाबतीतही तेच केले होते. मात्र, “बूस्टर’च्या डोसबाबत अन्य “चॉइस’ ठेवणार का, याबाबत अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. मात्र खबरदारी म्हणून असे केले जाणार नाही तर आधीचे दोन डोस ज्या कंपनीचे घेतले आहेत, त्याचाच तिसरा “बूस्टर’ डोस दिला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे.

याचीही नोंदणीप्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. यामध्येही आधारच्या आधारेच नोंदणी केली जाण्याची शक्‍यता असून, आधीच्या प्रमाणपत्रात कोणत्या कंपनीचे डोस दिले आहेत हे तपासूनच “बूस्टर’ दिला जाणार आहे.