पुणे : आता 45 वर्षे वयापुढील नागरिकांना बूस्टर डोस द्या

वैद्यकीय क्षेत्र, नागरिकांची मागणी ः खासगी रुग्णालयांत लसींचे डोस शिल्लक

पुणे – गेल्यावर्षी 1 मार्चपासून, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षे वयापुढील सहव्याधी असणाऱ्या नागारिकांसाठीचा करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या टप्प्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे यावर्षीही किमान सगळ्या 45 वर्षांपुढील व्यक्तींना बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्र आणि नागरिकांमधून मागणी होत आहे.

एकूणच लसीकरण वेगाने आणि बऱ्यापैकी झाले असल्याने गर्दी कमी झाली आहे. याशिवाय सरकारी लसीकरण केंद्रांनाच नागरिक प्राधान्य देत असल्याने खासगी रुग्णालयातील लसींचे डोस शिल्लक आहेत. त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे आतातरी 45 वर्षे वयापुढील सर्वच नागरिकांना बुस्टर डोस देण्याला सुरूवात करा, अशी मागणी केली जात आहे.

केंद्र सरकारने 10 जानेवारीपासून 2022 आरोग्य कर्मचारी आणि दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या कोविड योद्‌ध्यांना तिसरा डोस सुरू केला आहे. तसेच, 60 वर्षे पुढील ज्यांना सहव्याधी आहेत आणि दुसरा डोस घेउन 9 महिने पूर्ण झाले आहेत त्यांनाही तिसरा दक्षता डोस देण्यात येत आहे. त्यामुळे आता 45 वर्षे वयापुढील नागरिकांनाही बुस्टर डोस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

“सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये कोणाकडे किती कोविशिल्डचे डोस शिल्लक आहेत, याची माहीती घेण्यात येत आहे. मात्र, ढोबळमानाने 10 ते 12 हॉस्पिटलमध्ये सव्वालाख डोस शिल्लक असून, त्यापैकी 40 ते 50 हजार डोस यांची मुदत संपण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी सरकारने 45 वर्षाच्या पुढील वयोगटाला दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्यांनाही तिसरा दक्षता डोस देण्यास परवानगी देण्यात यावी.”
– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा