PUNE: शेतपिकांच्या नुकसानीपोटी भरपाईचे आदेश

पुणे – जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड, एकूण कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांसाठी संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.

तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील 3-4 आठवड्यापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण बदल, पर्जन्यमानातील असाधारण बदल यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 20 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तफावत, मोठ्या प्रमाणात कीड, रोग यांचा प्रादुर्भाव व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधिक सूचकांच्या आधारे भरपाई देण्याचे ठरवले जाते.

या सूचकांच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्‍त पाहणीनुसार बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या पिकाचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. यात हवेली-14, आंबेगाव-दोन, शिरुर-दहा, इंदापूर-11, दौंड-15 आणि पुरंदरमधील 8 मंडलांचा समावेश आहे. त्यानुसार या मंडलमधील बाजरी, कांदा, सोयाबीन, तूर, भुईमूग या पिकांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.