PUNE: लोका सांगे ब्रह्मज्ञान…; मनपाच्या स्वच्छतागृह, कार्यालयात पाण्याची नासाडी

पुणे – खडकवासला धरणसाखळीत यंदा अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. तर, दुसऱ्या बाजूला मनपा इमारती तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही काहीच केले जात नसल्याची स्थिती आहे.

महापालिकेने दैनंदिन पाणी वापरात बचत करावी, तसेच पाणीकपात करावी अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली आहे. त्यामुळे पाणीबचतीचे नियोजन सुरू असले, तरी दुसरीकडे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, नाट्यगृहे, सावरकरभवन, क्षेत्रीय कार्यालय तसेच पीएमपीच्या कार्यालयांच्या स्वच्छतागृहांतही मोठया प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही गळती रोखल्यास महापालिकेस मोठी पाणी बचत करता येणार असली, तरी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने पाण्याची नासाडी सुरू आहे.

“मनपा मुख्य इमारतीत स्वच्छतागृहांतील नळ चोरी गेल्याने पाणीगळती होत आहे.तेथे सतत पाणी वाहत आहे. याबाबत मी अनेकदा तक्रार केली असली, तरी तक्रार एकमेकांकडे टोलवली जात आहे. पाणीगळती सुरूच आहे. महापालिकेने आपल्याच सर्व कार्यालयांतील पाणीगळती थांबवल्यास मोठ्या प्रमाणात बचत होईल.” – रुपेश केसेकर, सजग नागरिक, मनपा