Pune: पीएमपी बसची दुचाकीसह चार वाहनांना धडक

कोथरूड – एनडीए चौकातून उताराने कोथरूड डेपोच्या दिशेने जात असलेल्या पीएमपी चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसने समोरील दुचाकीसह तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक दिली. लोहिया आयटी जैन पार्क समोर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता घडलेला अपघाताचा थरारनाट्यामुळे क्षणभर सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसून, एक दुचाकीस्वार जखमी तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोतीराम गायकवाड (वय 30, रा. भुगाव) असे जखमी तरूणाचे नाव असून, त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. दरम्यान, ही बस पीएमपीच्या स्व-मालकीची असून चालक आरबाझ रशिद शेख हे पौड ते मार्केट यार्ड मार्गावरील बस (एमएच १२ ईवाय ५३९०) एनडीए चौकातून कोथरूडच्या दिशेने घेऊन जात होते.

रस्ता तीव्र उताराचा असल्यामुळे ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, ब्रेक न लागल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस समोर असलेल्या वाहनांना जोरात धडक दिली. यामध्ये एक दुचाकीस्वार बसखाली गेल्यामुळे जखमी झाला असून, त्याचा पाठीला मुक्का मार लागल्यामुळे ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तर अन्य चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये एक दुचाकी, एक रिक्षा आणि तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, अपघातामुळे काहीवेळ वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतुक पोलिस आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

बसचा ब्रेक न लागल्यामुळे अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी पीएमपी बस ताब्यात घेतली असून, आरटीओच्या पथकाकडून तपासणी केल्यानंतर बसचा ब्रेक फेल झाला की, चालकाचा ताबा सुटला याचा अहवाल समोर येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.