Pune: आज निम्या मुळशीचा वीजपुरवठा बंद

पुणे – महापारेषण कंपनीच्या पिरंगुट 220/22 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि.३) सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुळशी तालुक्यातील काही गावातील सुमारे ६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महापारेषणच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम रविवारी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या उपकेंद्राशी जोडलेल्या पाच वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामध्ये ४ वीजवाहिन्या उच्चदाब वीजग्राहकांसाठी आहेत तर एका वीजवाहिनीवरून घोटावडे, भरे, रिहे, कातरखडक, पिंपोली, मुलखेड, खानेकर वस्ती, भेगडेवाडी, ओझरकरवाडी, आंधेले गाव, बोरकरवाडी, आमलेवाडी, मातरवाडी, पडळकरवाडी, लांडगेवाडी, केमसेवाडी, खांबोली, गोडंबीवाडी एक व दोन, शेळकेवाडी, देवकरवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांना वीजपुरवठा केला जातो.

त्यामुळे सुमारे सहा हजार लघुदाब व चार उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.