PUNE: पाण्याच्या नियोजनाची माहिती द्या; महापालिका प्रशासनाचे जलसंपदा विभागाला पत्र

पुणे – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरण्याचे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेस दिले आहे. त्यावर महापालिकेने धरणातील उपलब्ध पाणी आवर्तनाचे नियोजन, किती पाण्याचे बाष्पीभवन होणार याची माहिती मागवली आहे. या आधारवर पालिकेकडून पुढील सहा महिन्यांच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे.

पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता (विद्युत) रामदास तारू यांनी हे पत्र जलसंपदा विभागास पाठविले आहे. महापालिकेकडून शहरातील दैनंदिन पाणी वापर कमी करण्याचे नियोजन आहे. पण, सध्या तरी पाणी पुरवठयात कोणतीही कपात केलेली नाही. तर, दुसऱ्या बाजूला जलकेंद्र तसेच मुख्य जलवाहिन्यांंवरील गळती रोखली जात आहे. त्यामुळे महापालिकेचा दैनंदिन पाणी वापर १६९० ते १६९५ एमएलडीवरून १६२५ ते १६३० एमएलडी पर्यंत कमी झालेला आहे.

दरम्यान, धरणांतील साठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने महापालिकेस पुढील पाच ते सहा महिन्यांसाठी नेमके किती पाणी उपलब्ध होणार, याची माहिती मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नियोजन करणे आणखी सोपे जाणार आहे. त्यामुळे या माहितीसह सद्यस्थितीत पाण्याच्या वापरात आणखी काय बदल करावेत, अशी विचारणा या पत्राद्वारे मनपा प्रशासनाने केली आहे.

कालव्यातून पाणी घेणे बंद

महापालिकेकडून नवीन मुठा उजव्या कालव्यातून शहरासाठी पाणी घेतले जात होते. सुरूवातीला पर्वती, लष्कर तसेच आता मांजरी- फुरसुंग़ी पाणी योजनेसाठी हे पाणी घेतले जात होते. मात्र, टप्प्याटप्प्याने पाणी उचलणे बंद केले असून खडकवासला ते पर्वती बंद जलवाहिनीतील पाणी घेतले जाते. तर मांजरी-फुरसुंगी योजनेसाठी लष्कर जलकेंद्रातून पाणी दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरासाठी कालव्यातून पाणी घेणे पूर्णपणे बंद झाले आहे. परिणामी, कालव्यातून महापालिकेसाठी पाणी सोडल्यानंतर होणारी पाण्याची गळती पूर्णपणे थांबली आहे. याचा खर्च महापालिकेकडून वसूल केला जात होता.

पालिकेला हवी आहे ही माहिती
– खडकवासला, भामा-आसखेड तसेच पवना धरणातील पाण्याचा साठा
– शेतीसाठी सोडल्या जाणार्‍या आवर्तनाचे नियोजन
– दि. १५ जुलै अखेरपर्यंत संभाव्य बाष्पीभवनानंतर शिल्लक रहणारे पाणी