पुणे : रजत कुलकर्णीने गाजवला स्वरमंच ; ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रंगत

पुणे – तरुण गायक रजत कुलकर्णी यांनी शुक्रवारी सवाईचा स्वरमंच गाजवला. पूर्वार्धात ररजत आणि ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांचे गायन झाले.

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर या युवा गायकाने प्रथमच संगीतसेवा रुजू केली. मधुवंती रागात त्यांनी ‘हू तो तोरे कारन’ हा ख्याल मांडला. ‘एरी आयी कोयलिया बोले’ या द्रुत बंदिशीतून त्यांच्या तयारीचे, लयकारीचे दर्शन घडले. रजत यांनी पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली म्हणून कन्नड भजन सादर केले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हा तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय तन्मयतेने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि ‘वन्समोआर’ मिळवला.

त्यांना पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), माऊली टाकळकर आणि वसंत गरूड (टाळ), वीरेश संकाजी व मोबीन मिरजकर (तानपुरा) यांनी साथ केली.

त्यानंतर ज्येष्ठ गायिका आणि सवाई गंधर्वांच्या नातसून पद्मा देशपांडे यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी सरस्वती रागात ‘पिया बिन मोहे’ ही बंदिश रूपक तालात सादर केली. तसेच ‘माते सरस्वती ‘ ही स्वरचित बंदिश तीनतालात पेश केली. पद्माताईंनी ‘गोपालसारंग’ या रागाची निर्मिती केली आहे. या रागात त्यांनी ‘संग लीनो बालगोपाल’ ही बंदिश त्रितालात सादर केली. हा नवा राग देस राग आणि वृंदावनी सारंग या रागांच्या मिश्रणातून त्यांनी तयार केला आहे. मिश्र पहाडी मधील ‘घिर घिर बदरा काले छाये’ ही कजरी सादर करून पद्माताईंनी विराम घेतला.

त्यांना डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम), रामकृष्ण करंबेळकर (तबला) आणि श्रुती देशपांडे आणि ऐश्वर्या देशपांडे यांनी स्वरसाथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

उत्तरार्धात प्रसिद्ध सतारवादक निलाद्रीकुमार यांचे सवाईमध्ये सतारवादन सुरू असताना, या मैफिलीत त्यांचे वडील आणि गुरू पं. कार्तिककुमार आले. आपले वडील या मैफिलीत येणार हे त्यांना अजिबातच माहित नव्हते. त्यांच्यासाठी हे खास ‘सरप्राइज’ ठरले. वडील आल्यानंतर नीलाद्रीकुमार यांनी स्मितहास्य केले. त्यांच्या वादनाच्या शेवटी त्यांनी वडिलांनी शिकवलेली धून सादर करत सांगता केली.